बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी महिला व पुरुष नागरिकांना अटक
चाकण | पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत येणाऱ्या चाकण शहरात मोठ्या प्रमाणात औद्योगिक वसाहती असल्याने, काही भागांमध्ये बेकायदेशीरपणे बांगलादेशी नागरिक राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे, पोलीस आयुक्तालयने चाकणसह इतर ठिकाणी मोठे शोध अभियान हाती घेतले.
दिनांक 23 डिसेंबर 2024 रोजी, चाकण पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या आळंदी फाटा येथील साईराज लॉजिंगमध्ये बांगलादेशी नागरिक काम करत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे, पोलिसांनी सदर हॉटेलमध्ये छापा टाकला.
छाप्यात, टिंकू चौधरी आणि खादीजा खातून नावाच्या दोन बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून मिळालेल्या ओळखपत्रांची पडताळणी केली असता ती बनावट असल्याचे उघड झाले. त्यांनी स्वतःला बांगलादेशचे रहिवासी असल्याचे कबूल केले.
या दोघांवर भारतीय दंड संहिता आणि परकीय नागरिक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध पुढील तपास सुरू आहे.