Suryavanshi Respect for MS Dhoni: क्रिकेट म्हणजे केवळ चौकार-षटकारांची जुगलबंदी नाही, तर ती भारतीय समाजाच्या भावना, मूल्यं आणि संस्कृती यांची सुंदर गुंफण आहे. याचं जिवंत उदाहरण २० मे रोजी झालेल्या चेन्नई सुपर किंग्स (CSK) विरुद्ध राजस्थान रॉयल्स (RR) सामन्यानंतर दिसून आलं. राजस्थानचा अवघ्या १४ वर्षांचा युवा खेळाडू वैभव सूर्यवंशी याने संपूर्ण देशाचं मन जिंकलं, जेव्हा सामन्यानंतर त्याने महान कर्णधार महेंद्रसिंह धोनी यांच्या पाया पडून आपला आदर व्यक्त केला.
सामन्यानंतर दोन्ही संघांमधील खेळाडूंचं पारंपरिक हस्तांदोलन सुरु असताना, वैभवने अचानक धोनीच्या पायांशी वाकून नम्रतेने नमस्कार केला. धोनीनेही त्याला पाठीवरून शाबासकी देत त्याच्या या भावनेचं कौतुक केलं. हे दृश्य पाहून मैदानात आणि सोशल मीडियावर उपस्थित असलेले क्रिकेटप्रेमी भारावून गेले. काही सेकंदातच हा व्हिडिओ इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला. ट्विटर, इंस्टाग्राम आणि फेसबुकवर लोकांनी वैभवच्या संस्कारांचं भरभरून कौतुक केलं.

नवजोत सिंग सिधू आणि हरभजन सिंग यांच्यासोबतच्या पोस्ट-मॅच संवादात वैभवने सांगितलं, “धोनी सर हे माझ्यासाठी आणि अनेकांसाठी आदर्श आहेत. त्यांच्या विरोधात खेळण्याची संधी मिळणं हेच माझं भाग्य आहे. ते माझे सिनिअर आहेत, आणि त्यांना आदर देणं हे माझं कर्तव्य आहे.” या एका वाक्यातूनच वैभवच्या मनातील विनय, श्रद्धा आणि भारतीय संस्कृतीची खरी ओळख दिसून आली.
खेळाच्या मैदानावर जिंकणं महत्वाचं असलं, तरी काही क्षण असे असतात जे सामन्याच्या निकालापेक्षाही मोठे असतात. वैभव सूर्यवंशीने जे केलं, ते एक ‘संस्कारमूल्यांचा विजय’ होता. आजच्या स्पर्धात्मक जगात जिथं अनेक तरुण फक्त यशाच्या मागे धावत असतात, तिथं वैभवने आदर, नम्रता आणि मूल्यांचा आदर्श घालून दिला.
सम्बंधित ख़बरें

या सामन्यात राजस्थान रॉयल्सने चेन्नई सुपर किंग्सने दिलेलं १८८ धावांचं लक्ष्य केवळ १७.१ षटकांत पूर्ण केलं. युवा वैभव सूर्यवंशीने केवळ आपल्या संस्कारांनीच नाही, तर आपल्या बॅटनेही प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. त्याने ५७ धावांची जोरदार खेळी केली, ज्यात ४ चौकार आणि ४ भेदक षटकार होते. त्याच्या साथीला कर्णधार संजू सॅमसनने ४१, यशस्वी जयस्वालने ३६ आणि ध्रुव जुरेलने नाबाद ३१ धावा करत सामना राजस्थानच्या पारड्यात टाकला.

परंतु ही मॅच जशी मैदानावर फटकेबाजीने गाजली, तितकीच ती वैभवच्या नम्रतेने देखील गाजली. एका बालवयीन क्रिकेटपटूने आपल्या कृतीतून ‘संस्कार’ हा शब्द पुन्हा एकदा सजीव केला. यामुळे क्रिकेटप्रेमींच्या मनात धोनीप्रमाणेच आता वैभव सूर्यवंशीचंही एक खास स्थान निर्माण झालं आहे.