पुन्हा बीड हादरले! परळीत पुतण्याने चुलतीचा घेतला बळी!

बीड | बीड जिल्ह्यात गुन्हेगारी सत्र सुरूच असून माजलगाव तालुक्यात मागील काही दिवसात दोन खून झाल्याने खळबळ उडाली आहे. त्यातच आता परळी तालुक्यात एका धक्कादायक घटनेने जिल्ह्याला हादरवून सोडले आहे. कावळ्याची वाडी या खेडेगावात एका २५ वर्षीय पुतण्याने आपल्या ६५ वर्षीय चुलतीचा निर्घृण खून केला आहे. दारूसाठी पैसे न दिल्याने रागाच्या भरात पुतण्याने हे कृत्य केले.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी चंद्रकांत धुराजी कावळे हा दारूचा व्यसनी असून तो नेहमी आपली चुलती परिमाला बाबुराव कावळे यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैशांची मागणी करत असे. गुरुवारी सायंकाळी देखील त्याने पैशांची मागणी केली. मात्र, परिमाला यांनी पैसे देण्यास नकार दिल्याने चंद्रकांतला राग अनावर झाला.

रागाच्या भरात त्याने घरात असलेली कुर्‍हाड उचलली आणि चुलतीच्या डोक्यावर आणि अंगावर सपासप वार केले. या हल्ल्यात परिमाला यांचा जागीच मृत्यू झाला. हत्येनंतर आरोपी चंद्रकांत घटनास्थळावरून फरार झाला.

या घटनेमुळे परळी तालुक्यातील कावळ्याची वाडीत एकच खळबळ उडाली आहे. सिरसाळा पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपी चंद्रकांत कावळे याचा शोध घेत आहेत. मृत परिमाला कावळे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

मागील काही दिवसांपासून बीड जिल्ह्यात मारामारी आणि हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे. त्यातच आता झालेल्या या दुहेरी खुनाच्या घटनेमुळे जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. पोलीस या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी काय उपाययोजना करतात, याकडे आता लक्ष लागले आहे.

WhatsApp Icon Telegram Icon