Iran Firing On Indian Ship | सध्या संपूर्ण जगाचे लक्ष इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या संघर्षाकडे लागले आहे. या युद्धाचा सर्वाधिक फटका जागतिक व्यापार आणि तेल पुरवठ्याला बसला आहे. जगातील सर्वात संवेदनशील समजली जाणारी ‘होर्मुजची सामुद्रधुनी’ सध्या युद्धाचा आखाडा बनली असून इराणने ही खाडी पूर्णपणे बंद केली आहे. मात्र, अशा भीषण परिस्थितीत भारताने जे करून दाखवले, ते जगातील बड्या देशांनाही जमलेले नाही.
इराणच्या सैन्याने थेट गोळीबार करूनही न डगमगता भारताचे ‘देश गरिमा’ हे तेलवाहू जहाज होर्मुजची खाडी यशस्वीपणे ओलांडून मुंबईच्या दिशेने निघाले आहे. बुधवारी दुपारपर्यंत हे जहाज मुंबईच्या बंदरात दाखल होईल. या धाडसी कामगिरीमुळे भारताची ताकद आणि भारतीय खलाशांचे धैर्य पुन्हा एकदा जगासमोर सिद्ध झाले आहे.
नेमकं प्रकरण काय?
इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव वाढल्याने इराणने होर्मुजची खाडी रोखून धरली आहे. या खाडीतून जगाचा 30 टक्के तेल पुरवठा होतो. ती बंद झाल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे आणि एलपीजीचे भाव कडाडले आहेत. भारतातही यामुळे इंधन टंचाईचे संकट निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली होती. भारताची तब्बल 14 जहाजे या भागात अडकून पडली होती. भारताने या जहाजांच्या सुरक्षिततेसाठी इराणी अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू ठेवली होती, मात्र परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे.
गोळीबाराचा थरार आणि कॅप्टनचे धैर्य
18 एप्रिल रोजी भारतीय ध्वज असलेले ‘देश गरिमा’ हे प्रचंड मोठे तेलवाहू जहाज होर्मुजची सामुद्रधुनी ओलांडण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी इराणच्या आयआरजीसी (IRGC) सैन्याने या जहाजाला रोखण्यासाठी गोळीबार केला. परिस्थिती अत्यंत भयानक होती. एका बाजूला क्षेपणास्त्रे आणि गोळ्यांचा वर्षाव होत असताना, या जहाजाच्या कॅप्टनने आणि 31 भारतीय खलाशांनी मागे न फिरण्याचा निर्णय घेतला.
इराणच्या गोळीबारानंतर इतर अनेक देशांच्या जहाजांनी माघार घेतली. भारताचीच ‘सन्मार हेराल्ड’ आणि ‘जॅग अर्णव’ ही दोन जहाजे गोळीबारामुळे माघारी फिरली होती. मात्र, ‘देश गरिमा’च्या कॅप्टनने कमालीचे शौर्य दाखवत आपले जहाज सुरक्षितपणे खाडीबाहेर काढले. आनंदाची बाब म्हणजे, या गोळीबारात एकाही भारतीय खलाशाला इजा झालेली नाही.
सम्बंधित ख़बरें
भारतासाठी मोठा दिलासा
‘देश गरिमा’ हे जहाज मुंबईत दाखल होणे हा भारतासाठी केवळ व्यापारिक विजय नाही, तर तो एक मोठा धोरणात्मक विजय आहे. भारतात एलपीजी आणि कच्च्या तेलाचे संकट गहिरे होत असताना, या जहाजाच्या आगमनाने मोठा दिलासा मिळणार आहे. इराणसारख्या देशाने लष्करी बळाचा वापर करूनही भारतीय जहाजाला ते रोखू शकले नाहीत, ही बाब जागतिक राजकारणात भारताची वाढती प्रतिमा अधोरेखित करते.
जगाला बसला आश्चर्याचा धक्का
आजवर अमेरिका किंवा युरोपातील प्रगत देशांनाही इराणच्या या अडवणुकीसमोर झुकवे लागले आहे. मात्र, भारतीय जहाजाने ज्या पद्धतीने संकटावर मात केली, त्याचे जगभरातून कौतुक होत आहे. भारत सरकार सतत इराणी प्रशासनाच्या संपर्कात असून, अडकलेल्या इतर 13 जहाजांनाही सुखरूप बाहेर काढण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहेत.
तूर्तास, मुंबईचे बंदर आपल्या या धाडसी खलाशांच्या आणि ‘देश गरिमा’ जहाजाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे. या जहाजाच्या यशस्वी प्रवासामुळे भारताचा इंधन पुरवठा सुरळीत होण्यास मोठी मदत होणार आहे.