Ashok Kharat New Case | तुमचा मित्र सुखरूप येईल’ म्हटलं अन् दोन दिवसातच मृतदेह सापडला; अशोक खरातचा आणखी एक कारनामा समोर

Ashok Kharat New Case

Ashok Kharat New Case: अंधश्रद्धेचे जाळे पसरवून लोकांना भुलवणाऱ्या अशोक खरात याच्या भोंदूगिरीचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपांनंतर, आता माजी आमदार शिवाजी सहाणे यांनी स्वतः समोर येत खरातच्या खोट्या भविष्यवाणीचा पर्दाफाश केला आहे. खरातने दिलेला शब्द खोटा ठरला आणि एका मित्राला आपला जीव गमवावा लागला, असा खळबळजनक खुलासा सहाणे यांनी केला आहे.

शिवाजी सहाणे यांनी सांगितले की, अशोक खरातसोबत त्यांचा परिचय आठ-दहा वर्षांपूर्वी झाला होता. मात्र, चार वर्षांपूर्वी घडलेल्या एका घटनेमुळे खरातचा खरा चेहरा त्यांच्यासमोर आला. सहाणे यांचा एक जवळचा मित्र अचानक घरातून बेपत्ता झाला होता. पोलीस तपास सुरू होताच, पण काही मित्रांच्या आग्रहाखातर सहाणे यांनी खरातला फोन केला. तेव्हा खरातने अत्यंत आत्मविश्वासाने सांगितले होते की, “तुमचा मित्र सुखरूप आहे आणि तो दोन दिवसांत घरी परत येईल.”

मात्र, नियतीला काही वेगळेच मान्य होते. खरातने ‘सुखरूप’ असल्याचा दावा केल्यानंतर अवघ्या दोनच दिवसांत त्या मित्राचा मृतदेह गोदावरी नदीत सापडला. या घटनेने सहाणे आणि त्यांच्या मित्रपरिवाराला मोठा धक्का बसला. खरातची भविष्यवाणी केवळ खोटीच नव्हती, तर ती अत्यंत बेजबाबदारपणाची होती, हे यावरून स्पष्ट झाले. या एका घटनेमुळे सहाणे यांचा खरातवरील उरलासुरला विश्वासही कायमचा उडाला.

Ashok Kharat New Case
Ashok Kharat New Case

खरातच्या या कारनाम्याचा सिलसिला इथेच थांबला नाही. अगदी तीन-चार महिन्यांपूर्वीची दुसरी एक घटना सहाणे यांनी सांगितली. एका मित्राचा मुलगा घरातून निघून गेला होता, म्हणून पुन्हा खरातची मदत घेण्याचा प्रयत्न झाला. सुरुवातीला खरातने फोन उचलला नाही, पण नंतर स्वतः फोन करून “दोन-तीन दिवसांत मुलगा घरी येईल,” असे मोघम उत्तर दिले. खरात केवळ लोकांच्या भावनांशी खेळत होता, हे सहाणे यांच्या बोलण्यातून स्पष्ट झाले.

अंजली दमानिया यांनी खरात प्रकरणात शिवाजी सहाणे यांच्या नावाचा उल्लेख केल्यानंतर राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चा सुरू झाली होती. त्यावर स्पष्टीकरण देताना सहाणे यांनी ही वस्तुस्थिती मांडली. खरातच्या दाव्यांमध्ये कोणतेही तथ्य नसते आणि तो केवळ लोकांना फसवण्याचे काम करत होता, हेच या सर्व प्रकारातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. सामान्य जनतेने अशा भोंदूगिरीला बळी पडू नये, असे आवाहनही या निमित्ताने केले जात आहे.

WhatsApp Icon Telegram Icon