26 New MLC Seats Maharashtra | मोठी बातमी: महाराष्ट्राला मिळणार २६ नवे आमदार; विधान परिषदेचा ‘काऊंटडाऊन’ सुरू!

26 New MLC Seats Maharashtra

26 New MLC Seats Maharashtra: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. पुढील काही दिवसांत राज्यात विधान परिषदेच्या २६ जागांसाठी निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीमुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी धामधूम पाहायला मिळणार असून, सत्ताधारी महायुती आणि विरोधी महाविकास आघाडी या दोघांसाठी ही अस्तित्वाची लढाई ठरणार आहे.

९ दिग्गज नेत्यांचा कार्यकाळ संपणार

येत्या १३ मे २०२६ रोजी विधान परिषदेतील ९ सदस्यांचा कार्यकाळ संपत आहे. यामध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपसभापती नीलम गोऱ्हे, अमोल मिटकरी, शशिकांत शिंदे आणि राजेश राठोड यांसारख्या बड्या नेत्यांचा समावेश आहे. या ९ जागा विधानसभेच्या आमदारांमार्फत निवडून दिल्या जातात. सध्याच्या संख्याबळानुसार भाजपच्या पारड्यात ५ जागा सहज पडू शकतात, तर शिवसेना २ आणि राष्ट्रवादीला १ जागा मिळू शकते. महाविकास आघाडीच्या वाट्याला १ जागा जाण्याची शक्यता आहे. मात्र, जास्तीचे उमेदवार रिंगणात उतरवून ही निवडणूक चुरशीची करण्याचे प्रयत्न दोन्ही बाजूंनी होऊ शकतात.

१७ जागांचा अडीच वर्षांचा ‘वनवास’ संपणार

सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, गेल्या अडीच वर्षांपासून रिक्त असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या १७ जागांवर आता निवडणूक होण्याची चिन्हे आहेत. महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका रखडल्यामुळे या जागा रिक्त होत्या. मात्र, आता निवडणूक आयोगाने ७५ टक्के मतदारांच्या उपलब्धतेचा नवा नियम लावून या जागा भरण्याची तयारी केली आहे. सोलापूर, पुणे, ठाणे, नाशिक आणि नागपूर यांसारख्या महत्त्वाच्या जिल्ह्यांचा यात समावेश आहे.

26 New MLC Seats Maharashtra

कुठे कुठे होणार निवडणुका?

यामध्ये सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, सांगली-सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा-गोंदिया, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, अमरावती, धाराशिव-लातूर-बीड, परभणी-हिंगोली, छत्रपती संभाजी नगर-जालना आणि नागपूर या मतदारसंघांचा समावेश आहे. या १७ जागांवर विजय मिळवण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे.

राजकीय समीकरणे बदलणार

पुढील आठवड्यात या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. या २६ जागांवर मिळणारा विजय येणाऱ्या काळात राज्याची राजकीय दिशा ठरवणारा असेल. महायुती आपले वर्चस्व कायम राखण्यासाठी प्रयत्न करत आहे, तर महाविकास आघाडी जास्तीत जास्त जागा जिंकून सत्ताधाऱ्यांना धक्का देण्याच्या तयारीत आहे. विशेषतः कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील जागांवर यावेळी सर्वांचे लक्ष असेल.

WhatsApp Icon Telegram Icon