Rajasthan Kiradu Temple Mystery | भारत हा गूढ आणि रहस्यांनी भरलेला देश आहे. येथे अशी अनेक ठिकाणे आहेत ज्यांचा उलगडा आजही विज्ञानाला करता आलेला नाही. असंच एक ठिकाण म्हणजे राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यातील ‘Kiradu Temple’. दिवसा या मंदिराचं सौंदर्य आणि तिथलं कोरीव काम पाहून पर्यटक थक्क होतात, मात्र सूर्य मावळतीला जाताच येथील चित्र पूर्णपणे बदलतं. संध्याकाळनंतर या परिसरात पाऊल ठेवणं म्हणजे मृत्यूला किंवा एका भयाण शापाला आमंत्रण देण्यासारखं मानलं जातं.
राजस्थानचं ‘खजुराहो’ पण रहस्याने वेढलेलं
बाडमेरपासून सुमारे 35 किलोमीटर अंतरावर असलेल्या या मंदिरांच्या समूहाला ‘राजस्थानचे खजुराहो’ म्हटले जाते. 10 व्या ते 12 व्या शतकाच्या दरम्यान बांधलेली ही पाच मंदिरे आपल्या वास्तुकलेसाठी प्रसिद्ध आहेत. दक्षिण भारतीय शैलीत बांधलेल्या या मंदिरांमधील सोमेश्वर मंदिर हे मुख्य आहे. उत्तर भारतात असूनही दक्षिण भारतीय कलेचा हा नमुना पाहण्यासाठी पर्यटक लांबून येतात. मात्र, हेच पर्यटन स्थळ रात्रीच्या वेळी एका निर्जन आणि भीतीदायक जागेत रूपांतरित होते.

एका शापामुळे गाव बनलं दगडाचं!
या मंदिराशी संबंधित सर्वात मोठी भीती म्हणजे तिथला ‘शाप’. स्थानिक लोककथेनुसार, अनेक वर्षांपूर्वी एक महान ऋषी आपल्या शिष्यांसह येथे वास्तव्यास आले होते. एकदा ऋषी भ्रमंतीसाठी बाहेर गेले असता, त्यांनी गावकऱ्यांना आपल्या शिष्यांची काळजी घेण्याची विनंती केली. मात्र, ऋषी गेल्यानंतर गावकऱ्यांनी त्यांच्या शिष्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. अन्नाविना आणि औषधाविना एका शिष्याचा मृत्यू झाला. जेव्हा ऋषी परतले आणि त्यांना हे समजले, तेव्हा ते रागाने लालबुंद झाले.

सूर्यास्तानंतर जे थांबले, ते कधीच परतले नाही!
संतापलेल्या ऋषींनी संपूर्ण गावाला शाप दिला की, ज्या लोकांच्या मनात माणुसकी नाही, त्यांनी दगड बनून राहावे. त्यांनी शाप दिला की, सूर्यास्तानंतर जो कोणी या मंदिरात किंवा परिसरात थांबेल, तो दगडाचा होईल. अशी मान्यता आहे की, एका कुंभारणीने शिष्यांची थोडी मदत केली होती, म्हणून ऋषींनी तिला गाव सोडून जाण्यास सांगितले आणि मागे वळून न बघण्याची अट घातली. पण तिने कुतूहलापोटी मागे वळून पाहिले आणि ती देखील दगडाची बनली. आजही मंदिरापासून काही अंतरावर त्या महिलेचा दगडी पुतळा पाहायला मिळतो, असे स्थानिक सांगतात.
सम्बंधित ख़बरें

विचित्र आवाज आणि जीर्णोद्धाराचे प्रयत्न
स्थानिक लोकांमध्ये या जागेबद्दल इतकी दहशत आहे की, सूर्य मावळण्यापूर्वीच मंदिर परिसर पूर्णपणे रिकामा केला जातो. काही पर्यटकांनी असा दावा केला आहे की, रात्रीच्या वेळी येथून रडण्याचे किंवा ओरडण्याचे विचित्र आवाज येतात. विशेष म्हणजे, अनेक वेळा या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे प्रयत्न झाले, पण प्रत्येक वेळी काही ना काही अघटित घडले आणि ते काम अर्धवट राहिले.
आजही किराडू मंदिर (Kiradu Temple) हे इतिहासकार आणि पर्यटकांसाठी एक मोठे कोडं बनून राहिलं आहे. हे ऋषींच्या रागाचं प्रतीक आहे की

निव्वळ अफवा, हे सांगणं कठीण असलं तरी, आजही तिथली शांतता आणि शापाची कथा कोणाचंही काळीज धडधडवायला पुरेशी आहे. जर तुम्ही राजस्थानला जाणार असाल, तर या मंदिराला भेट नक्की द्या, पण लक्षात ठेवा… फक्त सूर्य असेपर्यंतच!