Valmik Karad Health | मस्साजोग गावचे तत्कालीन सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या अपहरण आणि क्रूर हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड (Valmik Karad) याच्याविषयी एक मोठी बातमी समोर आली आहे. बीड येथील मध्यवर्ती कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या वाल्मिक कराडची प्रकृती अचानक खालावली असून, त्याच्यावर तुरुंगातच तातडीने वैद्यकीय उपचार सुरू करण्यात आले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून त्याची तब्येत अधिकच बिघडल्याने कारागृह प्रशासनाची धावपळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कारागृहात बंदिस्त असलेल्या वाल्मिक कराडला गेल्या काही दिवसांपासून लघवी करताना तीव्र त्रास आणि वेदना जाणवू लागल्या आहेत. हा त्रास असह्य झाल्यामुळे मध्यवर्ती कारागृहातील डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले असून त्याला सलाईन लावण्यात आले आहे. गेले सलग तीन दिवस त्याच्यावर ही वैद्यकीय प्रक्रिया सुरू आहे. मात्र, तरीही त्याच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्यामुळे जिल्हा रुग्णालयाच्या एका विशेष वैद्यकीय पथकाने स्वतः कारागृहात जाऊन त्याची सखोल आरोग्य तपासणी केली आहे.
या तपासणीनंतर डॉक्टरांनी असा प्राथमिक अंदाज वर्तवला आहे की, वाल्मिक कराडला ‘युरोसिसटायटीस’ (Urocystitis) म्हणजेच मूत्राशयाचा अतिशय गंभीर संसर्ग झाला आहे. तुरुंगात सलाईनद्वारे उपचार देऊनही त्याची प्रकृती सुधारण्याऐवजी खालावत चालली आहे. यापूर्वीही त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले होते. परंतु, आता त्याचा हा संसर्ग पाहता, अधिक प्रगत आणि चांगल्या उपचारांसाठी त्याला परळी जवळील अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात हलवण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या मोठ्या हत्येकांडातील मुख्य आरोपीला दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याच्या हालचालींमुळे आता बीडमध्ये अनेक चर्चांना उधाण आले आहे.
विशेष म्हणजे, प्रकृती बिघडण्याच्या या घटनेपूर्वी याच बीड जिल्हा कारागृहात एक अत्यंत खळबळजनक प्रकार घडला होता. संतोष देशमुख हत्याकांडातील हाच मुख्य आरोपी वाल्मिक कराड आणि त्याचा सहकारी सुदर्शन घुले या दोघांवर तुरुंगातच इतर काही कैद्यांनी जीवघेणा हल्ला केला होता. काही दिवसांपूर्वी घडलेल्या या मारहाणीच्या घटनेमुळे बीड कारागृहातील कैद्यांच्या सुरक्षेचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला होता आणि संपूर्ण राज्यात याची चर्चा झाली होती.
संबधित बातम्या
या तुरुंगातील मारहाणीच्या मागे महादेव गिते आणि अक्षय आठवले या अन्य गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या कैद्यांचा हात असल्याची जोरदार चर्चा त्यावेळी रंगली होती. अत्यंत कडेकोट बंदोबस्त आणि सुरक्षा व्यवस्था असलेल्या बीडच्या मध्यवर्ती तुरुंगातच, अशा संवेदनशील खटल्यातील मुख्य आरोपींना लक्ष्य केले गेल्यामुळे प्रशासनाच्या सुरक्षा यंत्रणेवर खूप मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. या हल्ल्याच्या धसक्यातून आणि भीतीतूनच वाल्मिकची प्रकृती (Valmik Karad Health) आणखी बिघडली असावी, असा संशयही व्यक्त केला जात आहे. आता त्याला अंबाजोगाईला हलवल्यास तिथली सुरक्षा कशी असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.