90 Paise Formula Petrol Diesel Price | आता ‘९० पैशांचा फॉर्म्युला’ कंबरडं मोडणार? देशात पुन्हा पेट्रोल-डिझेल महागले!

90 Paise Formula Petrol Diesel Price

90 Paise Formula Petrol Diesel Price | सर्वसामान्य नागरिकांना महागाईचे एकामागून एक मोठे झटके बसत आहेत. मध्यमवर्गीय आणि गरीब जनता आधीच वाढत्या महागाईने होरपळत असताना, आता इंधन दरवाढीने सर्वसामान्यांचे बजेट पूर्णपणे कोलमडण्याची चिन्हे आहेत. अवघ्या पाच दिवसांपूर्वीच सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर ३ रुपयांची मोठी वाढ केली होती. हा धक्का ताजा असतानाच, आज पुन्हा एकदा इंधनाचे दर जवळपास एक रुपयाने (९० पैसे) वाढले आहेत. यामुळे आता बाजारात ‘९० पैशांचा फॉर्म्युला’ पुन्हा लागू होणार का, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

काय आहे हा ९० पैशांचा फॉर्म्युला?

यापूर्वी वर्ष २०२२ मध्ये रशिया-युक्रेन युद्धाच्या काळात आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर गगनाला भिडले होते. त्यावेळी तेल कंपन्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत होता. त्यावर तोडगा म्हणून मार्च ते एप्रिल २०२२ दरम्यान कंपन्यांनी ‘रोज थोडे थोडे दर वाढवण्याचा’ फॉर्म्युला वापरला होता.

त्यावेळी सलग १५ दिवसांत तब्बल १३ वेळा पेट्रोल-डिझेल महागले होते आणि दररोज सरासरी ८० ते ९० पैशांची वाढ केली जात होती. सध्या मध्य-पूर्वेतील वाढता तणाव आणि ‘होर्मुज समुद्रधुनी’ बंद झाल्यामुळे पुन्हा एकदा तेलाचे जागतिक संकट गडद झाले आहे. त्यामुळे IOCL, BPCL आणि HPCL या सरकारी कंपन्या तोटा भरून काढण्यासाठी तोच जुना फॉर्म्युला पुन्हा वापरणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील नवे दर:

इंधनाच्या या ताज्या दरवाढीमुळे महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत.

नागपूर: नागपुरात पेट्रोलच्या दरात ९१ पैशांची तर डिझेलमध्ये ९३ पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे काल १०७.१६ रुपये असलेले पेट्रोल आज १०८.०७ रुपयांवर पोहोचले आहे. तसेच डिझेलचे दर ९३.७० रुपयांवरून ९४.६३ रुपये प्रति लिटर झाले आहेत.

छत्रपती संभाजीनगर: येथे पेट्रोल ९१ पैशांनी महागून १०८.५६ रुपयांवरून आता १०९.४७ रुपयांवर गेले आहे. तर डिझेल ९४ पैशांच्या वाढीसह ९५.०१ रुपयांवरून थेट ९५.९५ रुपये प्रति लिटर झाले आहे.

पुणे: पुण्यातही इंधनाचे दर ९० पैशांनी वाढले आहेत. नवीन दरवाढीनंतर पुण्यात पेट्रोल १०७.८६ रुपये आणि डिझेल ९४.४० रुपये प्रति लिटर दराने मिळत आहे.

अमरावतीत पेट्रोलचा तुटवडा, पंपांवर शुकशुकाट

या आंतरराष्ट्रीय युद्धाचा थेट परिणाम आता महाराष्ट्रातील इंधन पुरवठ्यावरही दिसू लागला आहे. अमरावती शहरातील अत्यंत गजबजलेल्या पंचवटी चौकातील पेट्रोल पंपावर काल दुपारपासूनच पेट्रोल संपल्याचे समोर आले आहे. अजूनही तेथे नवीन टँकर पोहोचलेला नाही. मुख्य चौकातील पंप बंद असल्याने वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून, नागरिकांमध्ये प्रचंड मनस्ताप पाहायला मिळत आहे.

90 Paise Formula Petrol Diesel Price again SECOND HIKE
90 Paise Formula Petrol Diesel Price again SECOND HIKE

एकीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासीयांना इंधन बचतीचे आवाहन करत आहेत, तर दुसरीकडे आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे तेल कंपन्यांवर दरवाढीशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले जात आहे. अवघ्या ५ दिवसांत दुसऱ्यांदा झालेली ही दरवाढ पाहता, आगामी काळात इंधनाचे दर आणखी भडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

WhatsApp Icon Telegram Icon