Kalita Majhi | लोकशाहीचे सौंदर्य हे आहे की, इथे एखादी व्यक्ती किती श्रीमंत आहे यापेक्षा तिला लोकांचा किती पाठिंबा आहे, याला महत्त्व असते. याचाच प्रत्यय पश्चिम बंगालमधील औसग्राम (Ausgram in West Bengal) मतदारसंघात पाहायला मिळाला आहे. गेल्या 20 वर्षांपासून लोकांच्या घरी जाऊन भांडी घासण्याचे काम करणाऱ्या कलिता माजी आता चक्क ‘आमदार’ झाल्या आहेत. एका सामान्य घरकामगार महिलेने राजकीय क्षेत्रातील मातब्बरांना धूळ चारत विधानसभेची पायरी चढली आहे.
20 वर्षांचा संघर्ष आणि अडीच हजारांची कमाई
कलिता माजी यांची कौटुंबिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्या गेल्या दोन दशकांपासून दुसऱ्यांच्या घरी धुणी-भांडी करण्याचे काम करत होत्या. या कामातून त्यांना महिन्याकाठी केवळ 2,500 रुपये मिळत असत. एवढ्या तुटपुंज्या पगारात घर चालवत असतानाच त्यांनी समाजासाठी काहीतरी करण्याची जिद्द उराशी बाळगली होती. त्यांच्या या प्रामाणिक कष्टाची दखल घेत भाजपने त्यांना उमेदवारी दिली आणि एका कष्टकरी महिलेचा राजकीय प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला.

प्रचंड मताधिक्क्याने मिळवला विजय
औसग्राम हा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. या मतदारसंघातून कलिता माजी यांनी तृणमूल काँग्रेसचे बलाढ्य उमेदवार श्यामा प्रसन्न लाहोरी यांच्याविरुद्ध निवडणूक लढवली. कोणत्याही मोठ्या गाड्यांचा ताफा किंवा श्रीमंती थाट नसताना, कलिता यांनी पायी फिरून घरोघरी प्रचार केला. त्यांच्या या साधेपणाला जनतेने भरभरून प्रतिसाद दिला. कलिता माजी यांनी चक्क 12,535 मतांच्या फरकाने विजय मिळवत सर्वांनाच थक्क केले. त्यांना एकूण 1,07,692 मते मिळाली आहेत.
पराभवाने खचल्या नाहीत, जिद्दीने लढल्या
कलिता माजी यांचा हा विजय सहजासहजी मिळालेला नाही. त्या गेल्या 10 वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. सुरुवातीला त्यांनी पक्षाची एक सामान्य कार्यकर्ता म्हणून काम केले. त्यानंतर त्यांनी पंचायत निवडणुकांमध्येही सहभाग घेतला होता. विशेष म्हणजे, मागील विधानसभा निवडणुकीतही त्यांनी नशीब आजमावले होते, पण त्यावेळी त्यांना थोड्या मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता. 2021 मध्ये त्यांना 41 टक्के मते मिळाली होती. पराभव होऊनही त्यांनी लोकांची सेवा करणे सोडले नाही, ज्याचे फळ त्यांना या विजयाच्या रूपाने मिळाले आहे.
सामान्य माणसाच्या विश्वासाचा विजय
आजच्या काळात जिथे निवडणुकीत करोडो रुपये खर्च केले जातात, तिथे महिना अडीच हजार रुपये कमावणारी महिला आमदार होते, ही बाब कौतुकास्पद आहे. कलिता माजी यांचा विजय हा केवळ एका व्यक्तीचा विजय नसून तो लोकशाहीवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक सामान्य माणसाचा विजय आहे. अडीच लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या मतदारसंघाचे नेतृत्व आता एक अशी महिला करणार आहे, जिने गरिबीचे चटके स्वतः सोसले आहेत.
सम्बंधित ख़बरें
Kalitha Majhi – Her journey from
Domestic Help to MLAShe says, As MLA she will fight against Corruption and will work for women’s safety in schools, colleges, and hospitals. pic.twitter.com/GtahSmidRX
— Sheetal Chopra 🇮🇳 (@SheetalPronamo) May 5, 2026
प्रेरणादायी प्रवास
कलिता माजी यांची ही यशोगाथा (success story of Kalita Majhi) सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. कष्ट आणि जिद्द असेल तर परिस्थितीवर मात करता येते, हे त्यांनी सिद्ध केले आहे. “ज्या हातांनी लोकांची भांडी घासली, तेच हात आता लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी विधानसभेत उंचावले जातील,” अशा भावना स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत. त्यांच्या या विजयाने राजकारणात येण्याची इच्छा असलेल्या सामान्य कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
येणाऱ्या काळात Kalita Majhi आपल्या मतदारसंघातील प्रश्न कसे सोडवतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, त्यांनी मिळवलेला हा विजय भारतीय राजकारणाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल, यात शंका नाही!…