India-South Korea Trade | जगाचे लक्ष युद्धाकडे, भारताचा मात्र मोठा डाव! दक्षिण कोरियासोबत ऐतिहासिक करार, व्यापार होणार दुप्पट

India-South Korea Trade

India-South Korea Trade | सध्या संपूर्ण जगाचे लक्ष इराण-अमेरिका संघर्ष आणि जागतिक युद्धाच्या सावटाकडे लागलेले असताना, भारताने मात्र शांतपणे आपली आर्थिक ताकद वाढवण्यासाठी एक मोठी खेळी खेळली आहे. भारताने दक्षिण कोरियासोबत अत्यंत महत्त्वाचे संरक्षण आणि व्यापारी करार केले असून, यामुळे आशियातील शक्ती समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती ली जे. म्युंग यांच्यात झालेल्या द्विपक्षीय बैठकीत या ऐतिहासिक करारांवर शिक्कामोर्तब करण्यात आले.

2030 पर्यंत व्यापाराचे मोठे उद्दिष्ट

या बैठकीतील सर्वात मोठा निर्णय म्हणजे दोन्ही देशांमधील (India-South Korea Trade) व्यापार दुप्पट करणे. इतर माध्यमांच्या मिळालेल्या महितीनुसार सध्या भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यातील द्विपक्षीय व्यापार 27 अब्ज डॉलरच्या घरात आहे. हा व्यापार 2030 पर्यंत 50 अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय दोन्ही नेत्यांनी घेतला आहे. व्यापार वाढवण्यासाठी एक विशेष समिती देखील स्थापन करण्यात आली असून, दक्षिण कोरियाच्या कंपन्यांना भारतात आकर्षित करण्यासाठी खास ‘प्लॅन’ तयार करण्यात आला आहे. विशेषतः लघु उद्योगांना (SME) चालना देण्यावर या वेळी भर देण्यात आला.

१५ महत्त्वाचे करार आणि ६ मोठ्या घोषणा

या भेटीदरम्यान ऊर्जा, तंत्रज्ञान (Technology), सेमीकंडक्टर चिप्स, आणि युद्धनौका निर्मिती यांसारख्या 15 महत्त्वाच्या क्षेत्रांत करार करण्यात आले आहेत. संरक्षण क्षेत्रातील सहकार्य वाढवत असतानाच, भविष्यातील तंत्रज्ञानावर दोन्ही देशांनी एकत्र काम करण्याचे ठरवले आहे. यासोबतच सहा मोठ्या घोषणाही करण्यात आल्या. पंतप्रधान मोदींनी यावेळी स्पष्ट केले की, भारत आणि दक्षिण कोरियाचे संबंध केवळ व्यापारापुरते मर्यादित नसून ते हजारो वर्षांचे जुने सांस्कृतिक संबंध आहेत. हे नाते अधिक घट्ट करण्यासाठी 2028 मध्ये ‘फ्रेंडशिप फेस्टिवल’चे आयोजन केले जाणार आहे.

अमेरिकन टॅरिफला भारताचे चोख प्रत्युत्तर

गेल्या काही काळापासून अमेरिकेने भारतीय वस्तूंवर मोठ्या प्रमाणात टॅरिफ (कर) लादले आहेत, ज्याचा परिणाम भारताच्या निर्यातीवर झाला होता. मात्र, भारताने यातून मार्ग काढण्यासाठी जगातील इतर देशांसोबत ‘मुक्त व्यापार’ करार करण्याचा धडाका लावला आहे. युरोपियन युनियनसोबतच्या करारांनंतर आता दक्षिण कोरियाशी झालेला हा करार भारताची आर्थिक कोंडी फोडण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

संकट काळात मित्र देशांची साथ

जागतिक राजकारणात भारताने अत्यंत हुशारीने आपली बाजू मांडली आहे. अमेरिकेच्या टॅरिफमुळे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी रशियाने आधीच आपली बाजारपेठ भारतीय वस्तूंसाठी खुली केली होती. आता दक्षिण कोरियाने दाखवलेला विश्वास भारतासाठी मोठा दिलासा देणारा आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीमुळे जगाचे अर्थकारण विस्कळीत होत असताना, भारताने दक्षिण कोरियासोबत ऊर्जा आणि चिप निर्मितीमध्ये केलेले करार भारताला भविष्यात स्वयंपूर्ण बनवण्यास मदत करतील.

नवी दिल्ली ते सोल: भविष्याची नवी वाट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या करारांना ‘ऐतिहासिक’ असे संबोधले आहे. दोन्ही देशांनी लोकशाही मूल्ये, मुक्त बाजार अर्थव्यवस्था आणि आंतरराष्ट्रीय करारांचे पालन करण्यावर सहमती दर्शवली आहे. संरक्षण क्षेत्रातील ‘युद्धनौका’ निर्मितीचा करार हा भारताच्या सागरी सुरक्षेसाठी मैलाचा दगड ठरणार आहे. थोडक्यात सांगायचे तर, जग युद्धाच्या चर्चेत व्यस्त असताना भारताने दक्षिण कोरियासोबत हातमिळवणी (India-South Korea Trade) करून आपली अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलरकडे नेण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल टाकले आहे.

WhatsApp Icon Telegram Icon