Kedarnath Triangular Shivling | केदारनाथमधील शिवलिंगाचा आकार त्रिकोणी का? जाणून घ्या यामागची पौराणिक कथा आणि ‘पंच केदार’चे रहस्य

Kedarnath Triangular Shivling | चार धाम यात्रेला सुरुवात झाली असून बाबा केदारनाथचे दरवाजे भाविकांसाठी उघडले गेले आहेत. हिमालयाच्या कुशीत वसलेले केदारनाथ हे भगवान शिवाच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक अत्यंत पवित्र स्थान मानले जाते. दरवर्षी लाखो भाविक मोठ्या श्रद्धेने येथे दर्शनासाठी येतात. मात्र, केदारनाथच्या शिवलिंगाकडे पाहिल्यास एक गोष्ट चटकन लक्षात येते, ती म्हणजे येथील शिवलिंगाचा आकार. इतर ठिकाणच्या गोलाकार शिवलिंगांऐवजी येथे त्रिकोणी आकाराच्या (Kedarnath Triangular Shivling)  शिळेची पूजा केली जाते. या आगळ्यावेगळ्या आकारामागे एक मोठी पौराणिक कथा दडलेली आहे.

पांडव आणि भगवान शिव यांची कथा

असे मानले जाते की, महाभारताच्या युद्धानंतर पांडवांना आपल्याच नातेवाईकांच्या हत्येचे खूप दुःख झाले होते. या पापाचे प्रायश्चित्त करण्यासाठी ते भगवान शंकराचा आशीर्वाद मिळवण्यासाठी हिमालयात पोहोचले. मात्र, शिव पांडवांवर प्रसन्न नव्हते, त्यामुळे त्यांनी पांडवांना दर्शन देण्याचे टाळले आणि गुप्त होण्यासाठी एका बैलाचे रूप धारण केले. जेव्हा पांडवांनी त्यांना ओळखले, तेव्हा भगवान शिव पृथ्वीत गडप होऊ लागले. त्यावेळी भीमाने त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला, पण केवळ बैलाच्या पाठीचा त्रिकोणी भाग भीमाच्या हाती लागला. तोच भाग केदारनाथमध्ये स्थिरावला, ज्याची आजही ‘त्रिकोणी शिवलिंग’ (Kedarnath Triangular Shivling) म्हणून पूजा केली जाते. हे शिवलिंग शंकराच्या कुबडाचे प्रतीक मानले जाते.

सहा महिने मंदिर बंद राहण्याचे कारण

समुद्रसपाटीपासून अत्यंत उंचीवर असल्यामुळे केदारनाथमध्ये हिवाळ्यात प्रचंड बर्फवृष्टी होते. त्यामुळे वर्षातील सहा महिने हे मंदिर भाविकांसाठी बंद ठेवले जाते. या काळात भगवान केदारनाथांची ‘चल मूर्ती’ उखीमठ येथील ओंकारेश्वर मंदिरात हलवली जाते. हिवाळ्याचे सहा महिने तिथेच देवाची पूजा-अर्चा केली जाते आणि उन्हाळा सुरू झाला की पुन्हा वाजतगाजत मूर्ती केदारनाथ धाममध्ये आणली जाते. हा सोहळा पाहण्यासारखा असतो.

पंच केदारची संकल्पना काय आहे?

पौराणिक कथेनुसार, जेव्हा भगवान शिव बैल रूपात पृथ्वीत गडप झाले, तेव्हा त्यांच्या शरीराचे पाच वेगवेगळे भाग हिमालयातील पाच वेगवेगळ्या ठिकाणी प्रकट झाले. या पाच ठिकाणांना ‘पंच केदार’ म्हटले जाते. केदारनाथमध्ये ‘कुबड’ किंवा पाठीचा भाग, तुंगनाथमध्ये ‘बाहू’ (हात), रुद्रनाथमध्ये ‘चेहरा’, मदमहेश्वरमध्ये ‘नाभी’ आणि कल्पेश्वरमध्ये ‘जटा’ (केस) प्रकट झाले. अशीही मान्यता आहे की शिवाचे मस्तक नेपाळमधील पशुपतिनाथ मंदिरात प्रकट झाले. या पाचही स्थानांचे हिंदू धर्मात मोठे महत्त्व आहे.

विज्ञानापेक्षा श्रद्धेचा विजय

केदारनाथचे हे मंदिर हजारो वर्षांपासून नैसर्गिक आपत्तींशी झुंजत उभे आहे. 2013 मध्ये आलेल्या भीषण प्रलयकारी पुरात संपूर्ण परिसर उद्ध्वस्त झाला, पण मंदिराला साधी चराही गेली नाही. हे मंदिर कशा पद्धतीने बांधले गेले असेल, याचे आश्चर्य आजही वैज्ञानिकांना वाटते. मात्र, भाविकांसाठी हा केवळ विज्ञानाचा चमत्कार नसून बाबा केदाराचा आशीर्वाद आहे. त्रिकोणी आकाराचे (Kedarnath Triangular Shivling ) हे स्वयंभू शिवलिंग आजही कोट्यवधी लोकांच्या श्रद्धेचे आणि शक्तीचे केंद्र आहे.

WhatsApp Icon Telegram Icon